Friday, February 26, 2010
'संगणकाची जादुई दुनिया' पुस्तक उपयुक्त - मुख्यमंत्री
प्रशासनात गतीमानता आणण्यासाठी 'संगणकाची जादुई दुनिया' पुस्तक उपयुक्त - मुख्यमंत्री
प्रशासनात गतीमानता आणण्यासाठी तसेच पेपरविरहीत प्रशासनासाठी 'संगणकाची जादुई दुनिया' हे पुस्तक उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.
साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित व माजी सनदी अधिकारी लीना मेहेंदळे लिखित संगणकाची जादुई दुनिया या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री फौजिया खान, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव चंद्रा अय्यंगार, अल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती थँक्सी थेकेकरा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजितकुमार जैन, मुंबई महानगरपालिका आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, मुख्यमंत्र्यांचे सचिव नितिन करीर, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण तसेच जिल्हा पातळीवरील प्रशासनात संगणकाचा वापर अधिक वाढण्याची अपेक्षा असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, संगणकामुळे फाईलींचा निपटारा जलदगतीने होत असल्याने प्रशासनात गतीमानता आली आहे. यामुळे प्रशासन लोकाभिमुख होण्यास मदत झाली आहे.
संगणक वापराविषयीची भीती मनातून काढून टाकण्याची गरज असल्याचे सांगून राज्यमंत्री फौजिया खान म्हणाल्या की, हे पुस्तक शासकीय कर्मचारी, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना देखील दिशा देणारे ठरेल.
यावेळी मधु मंगेश कर्णिक म्हणाले की, समाजोपयोगी पुस्तक प्रकाशनावर साहित्य संस्कृती मंडळाचा भर राहिला आहे. त्यातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली आहे.
पुस्तक लिहिण्यामागची भूमिका विषद करताना लीना मेहेंदळे म्हणाल्या की, संगणक शिकण्याच्या युक्त्या वापरुन कामात सुलभता आणता येते. इंग्रजी वाचता न येणार्या लोकांसाठी संगणकाचा वापर सोप्या पद्धतीने कसा करावा यासाठी हे पुस्तक लिहिले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment